बंगळुरू – पी एम केअर्स फंडाबाबत काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केल्याप्रकरणी सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी शिवकुमार यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना लिहले आहे.
सोनिया गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय हेतूने प्रेरित असून यामध्ये करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत’ असं शिवकुमार यांनी या पत्राद्वारे म्हंटलं आहे. तसेच हा गुन्हा दाखल केलेले वकील के.व्ही.प्रवीण हे स्वतः एक भाजप कार्यकर्ते असून त्यांना भाजप नेत्यांनीच हा खोटा गुन्हा दाखल करण्यास भडकावले आहे असा आरोपही त्यांनी या पत्राद्वारे केला आहे.
सोनिया गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये सोनिया गांधी यांनी स्वतः ‘पंतप्रधान पी एम केअर फंडाचा दुरुपयोग करत आहेत.’ अशा आशयाचं ट्विट केल्याचं म्हंटलं असून हे पूर्णपणे असत्य आहे. हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने टीका करण्याच्या अधिकारावर बाधा येत असल्याचेही त्यांनी या पत्राद्वारे नमूद केलं आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करून सदर अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
Karnataka Congress Chief DK Shivakumar writes to Chief Minister BS Yediyurappa, demanding the withdrawal of the FIR registered against Congress President Sonia Gandhi over the party’s tweet regarding PM CARES Fund on May 11. https://t.co/ZmmYpRsENI pic.twitter.com/3kB17t2sw9
— ANI (@ANI) May 21, 2020
नक्की काय आहे प्रकरण?
पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याचा आरोप करत कर्नाटकमधील के.व्ही.प्रवीण नामक वकिलाने सोनिया गांधी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडची स्थापना केल्याची घोषणा 28 मार्च रोजी केली होती. कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये जास्तीत जास्त योगदान करण्याचे आवाहन मोदींनी केलं. यानंतर उद्योजकांपासून राजकारण्यांपर्यंत आणि खेळाडूं, कलाकारांपासून सामान्यांनी या फंडमध्ये भरघोस मदत केली.
पीएम केअर्स फंडची स्थापना एक स्वतंत्र पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करण्यात आली आहे. प्राईम मिनिस्टर सिटीझन असिस्टन्स अॅण्ड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड (PM CARES Fund) असं या फंडचं पूर्ण नाव आहे. परंतु या फंडच्या स्थापनेनंतर काँग्रेससह अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. देशात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी असताना नव्या पीएम केअर्स फंडची स्थापना करण्याची गरज काय असा सवाल विचारला जात आहे. काहींनी तर पीएम केअर्स फंड हा घोटाळा असल्याचेही म्हटले आहे. हा फंड कॅगच्या कक्षेबाहेर असू शकतो, जेणेकरुन या फंडमधून केलेल्या खर्चावर तसंच वापरावर कोणाची नजर नसेल, म्हणूनच त्याची स्थापना झाल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे.