दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित पळाला

सातारा – दरोड्याच्या गुन्ह्यात कराड तालुका पोलिसांनी अटक केलेला संशयित विकास वसंत गुंडनिकम शनिवारी पोलिसांच्या ताब्यातून पळाला. विकास याला सातारा येथील जिल्हा कारागृहातून न्यायालयीन कामकाजासाठी कराड येथे मुख्यालयातील पोलीस पार्टीने 14 संशयितांना नेले होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, विकास वसंत गुंडनिकम (रा. भाटमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) याला 2016 मध्ये कराड तालुका पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हापासून तो सातारा जिल्हा कारागृहातच आहे. शनिवारी दि. 21 रोजी त्याला सातारा मुख्यालयातील पोलीस पार्टीने कराड येथील न्यायालयात नियमित सुनावणीसाठी नेले होते.

न्यायालयातील कामकाज झाल्यानंतर पोलीस गाडी साताऱ्याकडे जाताना दुसऱ्या संशयिताने लघुशंका आल्याचे पोलिसांना सांगितल्याने पोलीस पार्टीच्या प्रमुखांनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गाडी घेण्यास चालकाला सांगितले. त्यानंतर लघुशंका आलेल्या आरोपीला बेडीतून काढताना त्याच बेडीत असलेल्या गुंडनिकम याने बेडी काढल्याचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो सापडला नाही. या घटनेची कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.