नारायणगाव (वार्ताहर) – येथील कोल्हे मळा येथे 75 वर्षीय करोना संशयित ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी सहा वाजता घडली, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ व सरपंच योगेश पाटे यांनी दिली.
डॉ. गुंजाळ व सरपंच पाटे म्हणाले की, 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे त्यांची पत्नी व मुलगी, असे तिघे हे दोन दिवसांपूर्वी नारायणगाव परिसरातील कोल्हेमळ्यात एका सोसायटीमध्ये राहण्यासाठी आले होते. त्यांनी गुरुवारी (दि. 28) ग्रामपंचायतीत येऊन मुंबईहून आल्याची माहिती देऊन नोंद केली होती. त्यामुळे त्यांना 14 दिवस होमक्वारंटाइन केले होते. यादरम्यान त्यांना मुंबईहून येतानाच ताप असल्याची माहिती त्यांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागापासून लपवली होती.
शुक्रवारी ही घटना घडल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, संबंधित ज्येष्ठ व्यक्तीस मुंबईतच ताप होता. त्याचे अहवाल सोबत घेऊन आम्ही तीनजण नारायणगावला आलो होतो, अशी माहिती त्यांनी प्रशासनास दिली.