कोलकता – पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह आढळले. त्यांच्या संशयास्पद मृत्यूवरून बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे.
बंगालमध्ये तीन महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यावरून निर्माण झालेला राजकीय तणाव अद्याप कायम आहे.
अशात बीरभूम जिल्ह्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला. तो मृतदेह रिकाम्या इमारतीमधील खोलीच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मात्र, मृत कार्यकर्त्याचे हात पाठीमागे बांधण्यात आले असल्याने त्याचा खून झाल्याचा संशय बळावला आहे. भाजपच्या आणखी एका कार्यकर्त्याचा मृतदेह मेदिनीपूर जिल्ह्यातील तळ्यात आढळला.
दोन कार्यकर्त्यांच्या संशयास्पद मृत्यूवरून भाजपने बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांची हत्या तृणमूलने आश्रय दिलेल्या गुंडांनी केल्याचे भाजपने म्हटले. मात्र, भाजपचे आरोप तृणमूलने फेटाळून लावले. भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या वैयक्तिक भांडणातून झाली. तर, दुसऱ्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली, असा दावा तृणमूलकडून करण्यात आला.