जम्मू – भारतीय लष्करातील एक मेजर दर्जाचे अधिकारी आज काश्मिरातल्या राजौरी जिल्ह्यात संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळले. जिल्ह्यातील थानामंडी भागातील लष्करी छावणीत त्यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आला.
ही माहिती मिळताच वरिष्ठ लष्करी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची कोर्ट ऑफ इन्क्वायरीही सुरू करण्यात आली आहे. संबंधीत अधिकाऱ्यांचे नाव आणि अन्य तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
ते संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळले म्हणजे त्यांच्या शरीरावर काही मारहाणीच्या किंवा गोळीबाराच्या खुणा आढळल्या किंवा कसे हेही जाहीर करण्यात आलेले नाही. कालच काश्मीरात सुरक्षा दलाचे एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन जवान असे चार जण अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्याची घटना घडली आहे.