अंगणवाडी सेविकेचा मुलांसह संशयास्पद मृत्यू

पतीसह सासू-सासऱ्यांना केली अटक

कर्जत – तालुक्‍यातील झिंजेवाडी येथील अंगणवाडी सेविका उज्ज्वला संदीप जाधव (वय 24), त्यांची मुले राजवीर (वय 5) व उत्कर्षा (8 महिने) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तिघांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. त्यांचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने पोलिसांनी जाधव यांच्या पतीसह सासरच्या मंडळींना ताब्यात घेतले आहे.
जाधव आपल्या कुटुंबांसह झिंजेवाडीत राहतात.

बुधवारी सकाळी त्यांचा घरात उज्ज्वला यांचा गळफास लावलेल्या अवस्थेत तर, मुलांचे मृतदेह पलंगावर आढळून आले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले व रुग्णालयात आणले. मात्र, हे प्रकरण संशयास्पद असून उज्ज्वला यांचा पती आणि सासूने खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली. त्यामुळे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, उज्ज्वला यांचा पती संदीप, सासू-सासरे आणि अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.