बॉलिवुड अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी सुष्मिता सेन तब्बल 10 वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सुष्मिता आपल्या खासगी आयुष्यातील अनेक क्षण चाहत्यांशी शेअर करत असते. यात आपली मुलगी, कुटुंबिय आणि बॉयफ्रेंडचे फोटो ती पोस्ट करत असते.
यावेळी माजी मिस यूनिवर्सने आणखी एक अपडेट चाहत्यांशी शेअर केले आहे. सुष्मिताने घोषणा केली आहे की, ती लवकरच 10 वर्षांच्या दिर्घ काळानंतर पुन्हा एकदा पदार्पण करणार आहे. तिने आपला एक फोटो पोस्ट करत लिहिले की, तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे मला सतत धैर्य मिळाल्याने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. यामुळेच मी चाहत्यांची चाहती झालेली आहे. मला पडद्यावर परत येण्यासाठी तब्बल 10 वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागली आहे. माझ्या प्रत्येक क्षणी मला प्रोत्साहन दिले आहे. मी फक्त तुझ्यासाठी परत येत आहे.
सुष्मिताने सोशल मीडियावर घोषणा करताच चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या या घोषणेमुळे अनेक चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. दरम्यान, सुष्मिताने आतापर्यंतच्या कारकिर्दीत “बीवी नंबर 1′, “मैं हू ना’, “आँखे’, “सिर्फ तुम’, “क्योंकि मैं झूठ नहीं बोलता’ यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविलेली आहे.