मुंबई : राज्यासह देशभरात सध्या पठाण चित्रपत आणि भगव्या रंगावरून राजकारण तापले असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या कपड्यावरून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली आणि या चित्रपटावर बॉयकॉटचा ट्रेंड देखील सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, यात सेंसरो बोर्डाने आवश्यक ते बदल करण्याचे आदेश चित्रपटाच्या निर्मात्यांना दिले. त्यानंतर आता या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. तसेच यावरून त्यांनी सरळ अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली आहे.
बीड येथील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात बोलत असताना सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर जळजळीत टीका केली. याविषयी बोलताना, “सध्या पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरुन बराच वाद, चर्चा होतेय. दीपीका पुदकोणच्या त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का? पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरं? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का?” असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी, ‘माफ कर मी जास्त स्पष्ट आहे. कारण मला पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहणे जास्त योग्य वाटते. “क्युकी मेरा जमीर जिंदा है, मै मुर्दा नही हू”.’ हे सांगत असतानाच सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर व्यक्त होताना काय काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन दिले.
सुषमा अंधारे यांनी यावेळी सोशल मीडिया आणि मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले. व्हॉट्सअप विद्यापीठातून तयार झालेल्या कार्यकर्त्यांवरही टीका केली. सोशल मीडियावर विरोधकांनी एक नरेटिव्ह बाजूला केले गेले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी मागच्या आठ वर्षात एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यावर कुणीही बोलायला तयार नाही, असेदेखील यावेळी त्यांनी सांगत भाजपवर टीका केली.