मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच, (शिवसेना) उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे या जोरदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या भाजपा, शिंदे गट आणि मनसेवर आपल्या कडक शब्दांत प्रहार करत असून, आपल्यावर केलेल्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देत आहेत. सध्या सुषमा अंधारे प्रबोधनयात्रा सुरू असून राज्यभरात मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आज त्यांची यात्रा मुंबईत दाखल झाली आहे.
आज (गुरुवार) मुंबईतील मुलुंड पूर्व येथे सायंकाळी 6 वाजता शिवसेना शाखा क्र. 105 (108), अंबिका प्लाझा बिल्डिंग, 90 फूट रोड, मुलुंड (पूर्व) या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार असून, सध्या सभेची जोरदार तयारी सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. शिवसैनिकांनी या सभेसाठी मोठी तयारी केली आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या आजच्या सभेला शिवसेना उपनेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी त्या उपस्थितांना संबोधित करणार आहेत. आपल्या खास शैलीत त्या विरोधकांना ‘सळो की पळो’ करून सोडणार आहेत. दरम्यान, नुकतंच कोल्हापुरातील यात्रेत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
यावेळी त्यांनी “लाव रे तो व्हिडीओ..’ म्हणणे उर्मटपणा असल्याचे म्हटले होते. तसेच, त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. करोना काळात भाजपने कशा थाळ्या वाजवायला लावल्या हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी या व्हिडिओतून केला होता. तसेच त्यांनी बंडखोरांवर कडाडून हल्ला चढवला होता.