मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं. यादरम्यान राज्यात अनेक घडामोडी झाल्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये जावे लागले. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आणि अल्पावधीतच आपली वेगळी ओळख राज्याच्या राजकारणात निर्माण केली. नुकतंच अंधारे यांनी शिंदे गटातील असंतोषाबाबत धक्कादायक विधान केलं.
सुषमा अंधारे या आपल्या सडेतोड भाषणासाठी ओळखल्या जातात. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर अंधारे यांनी माध्यमांमध्ये ठाकरे गटाची बाजू भक्कम करण्यासाठी अनेकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गट आणि भाजप या दोघांत खूप असंतोष आहे. येणाऱ्या काळात या असंतोषाचा भडका उडेल असा खळबळजनक विधान सुषमा अंधारे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांबाबत देखील भाष्य केलं.
“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सतत खटके उडत आहेत.शिंदे सोबत गेलेले अनेक आमदार अस्वस्थ आहेत. ते परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परत येतील की नाही माहीत नाही. पण, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार नाहीत हे निश्चित” असा विश्वास अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला. राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्यासाठी पत्र लिहिलं होत तो एक राजकीय डाव होता असाही अंधारे यावेळी म्हणाल्या.