Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed । सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयदीप आपटे याला पुतळा बांधण्याचे काम कसे मिळाले यावरून सरकारला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेरले जात आहे. अशात आज सुषमा अंधारे यांनी पुण्यात यावरून सरकारला प्रश्न विचारले आहे.
सुषमा अंधारे यांनी जयदीप आपटे आणि राणे यांचा फोटो दाखवला
जयदीप आपटे यांचा राणे यांच्याशी संबंध असल्याचे बोलतांना त्या म्हणाल्या,’ज्या आपटे संदर्भाने बोललं जातं, तो आपटे हा सनातन प्रभातची कसा संबंधित आहे, आणि सनातन प्रभातची याचे काय नाते आहे हे स्पष्टपणे दिसतं कारण या माणसाची मुलाखत याचं वय किती यावर मला जायचं नाही, कारण लहान वयातही माणसं मोठी काम करू शकतात हा आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा सांगतो त्यामुळे मला वयावर टिप्पणी करायची नाही पण जो माणूस दीड फुटाचा सुद्धा पुतळा उभा करू शकत नाही ज्याचं काम दीड फुटापेक्षा कमी पुतळे उभे करण्याचं होतं. अशा माणसाला एवढं मोठं काम का दिलं गेलं याच्या जेव्हा आम्ही खोलात जातो, तेव्हा असं लक्षात येतं की हा माणूस म्हणजे कोण आहे तर हा जयदीप आपटे सोबत सोबत नितेश राणे दिसत आहेत, नितेश राणे चा आणि जयदीप आपटेचा काय संबंध ते सांगितलं गेलं पाहिजे.
त्या पुढे म्हणाल्या, जयदीप आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पुतळा उभा करायचा आहे, तिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वाटत आहेत, तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं हा काय संदर्भ आहे ये रिश्ता क्या कहलाता है याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे असंही अंधारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जयदीप आपटे कोण आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
लहानपणापासून कलाक्षेत्राची आवड असल्याने जयदीप आपटेने आठवीत असतानाच या क्षेत्रात जाण्याचे ठरवले होते. कल्याणमधील त्यांच्या शाळेच्या रस्त्यावरच शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे. त्याचा प्रभाव जयदीपवर शालेय दशेपासूनच होता. मूळ गाव कल्याण असून आई-वडील दोघेही नोकरी करायचे. जयदीपचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदविका व नंतर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला.
जयदीप आपटे हा २५ वर्षांचा तरुणानेच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २ ८ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारला आहे. २ ८ फूट उंच हा पुतळा उभारण्यासाठी साधारण ३ वर्षांचा कालावधी लागतो. पण हा पुतळा जून २ ० २ ३ मध्ये बनविण्यास सुरुवात केली. अवघा सात महिन्यामध्ये हा पुतळा तयार करण्यात आला. अशी माहिती जयदीप आपटेकडून सनातन दैनिक या वृत्तपत्राला काही महिन्यांपूर्वी देण्यात आली होती.
त्याने मुलाखतीत पुतळा विषयी केलेले विधान चर्चेतही आले होते. ‘जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल…’ असेही आपटे म्हणाला होता. शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारू शकतो कि नाही अशी भीतीही त्याने व्यक्त केली होती. मुलाखतीत त्याने सांगितले होते,’या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला. संधी मोठी आहे, सगळं व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल, असे वाटले.. पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे.. संधी हातातून सोडायची नाही.’
त्याने पुढे सांगितले, हा ३५ फुटी उंच पुतळा उभा करताना जयदीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार होते. पुतळ्याला विलंब होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. ‘सहा फुटांचे मॉडेल पूर्ण झाल्यावर ते थ्रीडी स्कॅन केले गेले. स्कॅन केल्यावर खरे तर मॉडेल सीएनसी तंत्राने फोममध्ये कोरायचे ठरले होते; पण काही गणिते चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली. तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल थ्रीडी प्रिंट करण्याचे ठरवले. मित्रांनी अक्षरशः एका रात्रीत १८ नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम सुरू झाले व पुढे पुतळा उभा झाला’ असेही त्याने सांगितले.
‘कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय, या कामाच्या आधी 3 – 4 शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती. ती अगदी दीड दोन फुटांची होती; पण ती करताना अभ्यास होत होता. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती ‘एखादा पुतळा तयार करणार का?’, अशी. भारतीय नौदल काम करून घेणार. त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार; म्हणून मग मीच ठरवले की, काम करायचे. एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे ३ लहान नमुने (मॉडेल) बनवले. त्यातील २ नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले, असे जयदीप आपटेने मुलाखतीत सांगितले होते.