मुंबई – राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प काल सादर केला. या अर्थसंकल्पावर उद्योगनगरीतून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहिंनी या अर्थसंकल्पाला सर्वसमावेशक म्हटले आहे तर अनेकांनी यावर टीका केली आहे.
शेतकऱ्यांनी काही मुद्दयांवर अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे तर काही बाबींमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील या अर्थसंकल्पावर आपली भूमिका स्पष्ठ केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली आहे. यावेळी त्या बीड मध्ये बोलत होत्या.
“फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकप्रियता मिळवण्याच्या अनुषंगाने फक्त घोषणाबाजी करणारा अर्थसंकल्प आहे’, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, “सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या अनुषंगाने फक्त घोषणाबाजी करणारा अर्थसंकल्प आहे. मुळात बाबा आयेंगे बकरा काटेंगे. बोटी हमको, हड्डी तुमको असा सगळा कार्यक्रम सुरू आहे’, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली आहे.
अर्थसंकल्पातील महत्वाच्या 20 घोषणा…
– केंद्राप्रमाणे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी, शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये देणार
– महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
– धनगर समाजाला 1000 कोटी रुपये, महामंडळामार्फत 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
– 5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0
– मुलींसाठी लेक लाडकी योजना, जन्मानंतर मुलीला 5000 रुपये, – पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये, अकरावीत 8000 रुपये, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
– आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
– महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
– संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
– ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार
– महिलांना एसटी प्रवासात, सरसकट 50 टक्के सूट
– यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम, इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची “मोदी आवास घरकुल योजना’
– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता
– आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी रुपये
– मुंबईच्या सुशोभिकरणासाठी 1729 कोटी रुपये
– विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना 1000 वरुन 5000 रुपये तर आठवी ते दहावीच्या 1500 वरुन 7500 रुपये, विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत
– शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
– विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान
– राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधणार
– नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
– खेळाडूंची कामगिरी उंचाविण्यासाठी मिशन लक्षवेध, बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार