मुंबई – विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यातील वातावरण तापू लागले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असतानाच देशाचे माजी गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात एक विधान केले आहे. त्यांनी स्पृश्यास्पृश्यतेचा उल्लेख करत सावरकर यांची प्रशंसा केली आहे.
शिंदे म्हणाले की सावरकर यांनी अस्पृश्यता समाप्त करण्यासाठी केलेल्या कामाचा मी कायमच आदर केला आहे. त्यांनी पतीतपावन मंदिर बनवताना एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीकडून त्याची पायाभरणी केली होती. अस्पृश्यता समाप्त करण्याचा हाच एक मार्ग आहे असे सावरकर यांचे मानणे होते. मात्र भारतीय जनता पार्टी यावर कोणता प्रकाश टाकत नाही आणि त्यावर चर्चाही होत नाही.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसकडून भारतीय जनता पार्टीला कायमच लक्ष्य केले जाते. राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी सावरकर यांच्यावर आरोपच केले आहेत. या स्थितीत कॉंग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने सावरकरांबाबत असे विधान करणे महत्वाचे मानले जाते आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी काश्मीरच्या लाल चौकात जाण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचीही चर्चा सुरू आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना ते म्हणाले होते की जेंव्हा मी गृहमंत्री होतो तेंव्हा मला विजय धर यांनी सल्ला दिला होता की तुम्ही येथे भटकू नका.
तम्ही श्रीनगरला जाऊन लाल चौकात जा, तेथील लोकांना भेटा. त्यामुळे मला खूप लोकप्रियता मिळाली. लोकांना वाटले हे गृहमंत्री न घाबरता तथे जातात. मात्र प्रत्यक्षात मी किती घाबरलो होतो ते कोणाला सांगू.