सुुशीलकुमार शिंदे हे “डावे की उजवे’ ; सोलापूरात रंगली चर्चा

निवडणूक कर्मचाऱ्याच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली गेल्याचे निष्पन्न !

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुुशीलकुमार शिंदे हे डावे की उजवे अशी चर्चा सोलापुरात रंगली आहे. ही चर्चा निवडणूक निकाल किंवा विचारसरणीबद्दल नव्हे तर मतदानानंतर शिंदे यांनी दाखविलेल्या उजव्या हाताबद्दल आहे.

सोलापूर लोकसभेसाठी गुरूवारी मतदान झाले. कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी कुटुंबियांसह विजापूर रोडवरील नेहरूनगर येथील जागृती विद्यामंदिर शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. सकाळी 6.50 वा. मतदान केंद्रावर ते पोहचले. मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मशीन बसविणे व पोलिंग एजंटच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यास थोडा उशीर झाला. त्यानंतर पहिले मतदान शिंदे यांनी नोंदविले.

मतदान केंद्रावर जाताना कार्यकर्ते व मतदारांची गर्दी होती. पण शिंदे यांनी प्रोटोकॉलप्रमाणे रांगेत पहिला मान घेऊन मतदार यादीतील नाव तपासणीसासमोर गेले. गडबडीत त्यांना मतदान ओळखपत्र सापडेना. एवढ्या घाईतही त्यांनी ओळखपत्र शोधून मतदान केंद्र अधिकाऱ्यास दाखविले. या धांदलीत मतदान केंद्रावरील कर्मचारी गडबडले. शाई लावताना शिंदे यांनी उजवा हात पुढे केला. कर्मचाऱ्यानेही गडबडीत उजव्या हाताच्या बोटावर शाई लावली. या सोपस्करानंतर शिंदे यांनी या केंद्रावरील पहिले मतदान केले.

त्यानंतर पत्नी उज्ज्वला व मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदान केले. आमदार प्रणिती शिंदे यांनी बॅलेट मशीनवर बटन दाबल्यावर व्हीव्हीपॅट मशीन पाहिले. या मशीनमध्ये होणारा खडखडाट पाहून त्यांनी आवाजाबद्दल मतदान केंद्राधिकाऱ्यांपुढे शंका व्यक्त केली. मोठा आवाज येतोय, मशीन चेक करा अशी सूचना करून त्या मतदान केंद्राबाहेर पडल्या. मतदान नोंदविल्यानंतर शिंदे कुटुंबियांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी मतदान केल्याची खूण पटविण्यासाठी चुकून उजवा हात उंचावला. विशेष म्हणजे यावेळी पत्नी उज्वला व मुलगी आमदार प्रणीती शिंदे यांनी डावा हात दाखविला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.