पाटणा – कोरोना महामारीच्या संकटात बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपा जेडीयू याठिकाणी एकत्र निवडणूक लढवत आहेत. भाजपाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला असून यात मुख्य म्हणजे कोरोनाचा महामारीचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आता बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पाटण्यात भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात बिहारमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केलीय. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दिवसांपासून शरीरात हलका ताप होता, इतर सर्व पॅरामीटर नॉर्मल आहेत. मात्र, काळजी म्हणून एम्समध्ये दाखल होत असल्याचे मोदींनी ट्विट करुन सांगितलं आहे.