पाटणा – बिहारमधील भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांची आज राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. दिवंगत केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक राम विलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सुशील कुमार मोदी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
सुशील कुमार मोदी यांच्याव्यतिरिक्त अपक्ष उमेदवार श्याम नंदन प्रसाद यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जाच्या छाननीच्यावेळी त्यांचा अर्ज अपात्र ठरवला गेला. उमेदवारी अर्जाबरोबर विधानसभेतील 243 सदस्यांपैकी किमान 10 सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र जोडणे अपेक्षित होते.
मात्र प्रसाद यांच्या अर्जासोबत हे पत्र जोडलेले नव्हते. म्हणून त्यांचा अर्ज अवैध ठरवला गेला आणि सुशील कुमार मोदी यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत मोदी यांना राज्यसभा पोट निवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.