नवी दिल्ली : पैलवान सागर धनकड हत्याप्रकरणी सुशील कुमारचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण सागर धकडला हॉकी स्टीकने मारहार करतानाचा सुशील कुमारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात सुशील कुमार मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी सुशील कुमारच्या आणखी एक साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, आपण त्या वेळी स्टेडियममध्ये उपस्थित नव्हतो असे अटक केलेल्या पहिल्या दिवसापासून पैलवान सुशील कुमार सांगत आहे. पण समोर आलेल्या या व्हिडीओमधून सुशील कुमार खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका हॉकी स्टीकने सुशील कुमार हा सागर धनकडला मारहाण करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
An exclusive Video of Olympian wrestler #sushilkumar Attacking Junior Wrestler who died later pic.twitter.com/HBPscC4JJE
— Journalist Siraj Noorani (@sirajnoorani) May 27, 2021
सुशील कुमारला अडवण्यासाठी अनेकजण येत आहेत पण त्या सर्वांना बाजूला करुन सुशील कुमार हा सागरला मारताना दिसत आहे. या वेळी सुशील कुमारकडे एक पिस्तुल असल्याचे सांगण्यात येत होते. या व्हिडीओमध्ये एक पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला व्यक्ती अशी पिस्तुल हातात घेऊन स्टेडियममध्ये वावरताना दिसत आहे.
समोर आलेला हा व्हिडीओ पैलवान सागर धनकड हत्येप्रकरणी मोठा पुरावा मानला जात आहे. हा पुरावा आता पोलीस न्यायालयात सादर करणार आहेत. तसेच या व्हिडीओत दिसणाऱ्या सर्वांच्या साक्षीही घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेची कोणतीही माहिती अद्याप तरी पोलिसांनी दिली नव्हती.
सुशील कुमार विरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी आता हा व्हिडीओ खूप महत्वाचा पुरावा असल्याचे म्हटले जात आहे. सुशील कुमार तिथे होता आणि तो सागर धनकडला मारहाण करत होता हे या व्हिडीओतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.