आडनावाला लक्ष्य केल्यावरून पाऊल
पाटणा -मोदी आडनावाला लक्ष्य केल्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कोर्टात खेचले आहे. सुशील यांनी स्थानिक न्यायालयात राहुल यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.
राहुल यांनी अलिकडेच एका सभेत बोलताना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यावेळी त्यांनी सगळ्या चोरांचे आडनाव मोदी कसे, असा सवाल करताना हिरे व्यापारी नीरव मोदी आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी या देशाबाहेर पलायन केलेल्या आर्थिक गुन्हेगारांचाही संदर्भ दिला. ते वक्तव्य न रूचलेल्या सुशील यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.
राहुल यांच्या वक्तव्याने मी दुखावलो गेलो आहे. त्या वक्तव्याने मोदी आडनाव असणाऱ्यांची प्रतिमा मलिन झाली आहे, असे सुशील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यावर 22 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे समजते.