पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2019-20 मध्ये गैरव्यवहार करुन कोटयावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुशील खोडवेकर (वय-43) याचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे न्यायालयाने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पोलिसांनी दिलेल्या अर्जानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान, बचाव पक्षातर्फे ॲड. एस.के.जैन आणि ॲड.अमोल डांगे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.
सायबर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान त्याला रविवार (दि.30) पासून सर्दी, डोकेदुखी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याची ससून, नायडू रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्याबरोबरच स्वॅबही घेण्यात आला. त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले.
सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात सांगितले की, या गुन्हयाची व्याप्ती मोठी आहे. त्याची उकल होणे गरजेचे आहे. तत्कालीन राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ.प्रितेश देशमुख व मनोज डोंगरे यांच्याकडून आरोपीने लाखो रुपये स्विकारल्याचे तपासात समोर आले आहे. त्या अनुषंगाने तपास करुन पुरावा प्राप्त करणे आहे.
आरोपी विरुध्द तांत्रिक पुरावा पडताळणी बाकी असून, मिळालेल्या पोलीस कोठडी दरम्यान त्याची पूणर्त: शाहनिशा करता आलेली नाही. तांत्रिक पुराव्या शिवाय आणखी पुरावे हस्तगत करुन त्याच्या विरोधात दोषारोपत्र न्यायालयात दाखल करणे असल्याने उर्वरित पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेऊन त्यास न्यायालयीन कोठडी मिळावी.