राष्ट्रवादीच्या माजिद मेमन यांचे धक्कादायक वक्तव्य
मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत हयात असतानाही जितका लोकप्रिय नव्हता तितका तो आत्महत्या केल्यानंतर लोकप्रिय झाला आहे, असे धक्कादायक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी केले आहे. अर्थात, पक्षाने त्यांचे हे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगत सारवासारव केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा सुशांतबाबतच जास्त चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. कोणत्याही गुन्ह्याचा तपास जेव्हा सुरू असतो त्यावेळी मिळालेली माहिती गुप्त राखणे आवश्यक असते. अशी माहिती जाहीर केल्याने तपासावर विपरीत परिणाम होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सुरू असून त्यात त्याची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे रियावर मनी लॉंड्रिंगप्ररकरणी गुन्हा दाखल झाला आहे.