मुंबई – बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी 14 जून 2020 जून रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर विलेपार्ले येथील पवनहंस येथे असलेल्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर आणि वरुण शर्मासह बॉलिवूड मधील इतर सुद्धा कलाकार उपस्थित होते.
सुशांत सिंह राजपूतने टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंत मजल गाठली होती. बॉलिवूडमध्येही त्याने दमदार भूमिका साकारल्या आणि त्याच्या याच कामाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. मात्र, असंख्य चाहते त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही सावरले नसल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर अजूनही अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
दरम्यान, आता सुशांतच्या मृत्यूला अडीच वर्ष उलटून गेली असली तरी, ही आत्महत्या नसून हत्याचं असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं आहे. आता दोन वर्षांनी अभिनेत्याचं शवविच्छेद करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी मोठा खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना रुपकुमार शाह यांनी अनेक मोठे खुलासे केल्याचं दिसून आलं आहे.
रुपकुमार शाह म्हणाले की, “जेव्हा सुशांतचं निधन झालं तेव्हा शवविच्छेदनासाठी पाच मृतदेह आले होते. त्यामध्ये एक व्हीआयपी मृतदेह असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं, जेव्हा मृतदेहावरचा कपडा काढला तेव्हा शरीरावर मारहाणीच्या खूणा होत्या. गळ्यावर दोन-तीन वर्ण होते. असं त्यांनी सांगितलं आहे.
शाह पुढे म्हणाले, ‘जेव्हा मी सुशांतचा मृतदेह पाहिला तेव्हा मी वरिष्ठांना सांगितलं, ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं मला वाटतं. त्यामुळे आपण त्या पद्धतीने काम करायला हवं. पण ते म्हणाले लवकर फोटोंवर काम करायचं आहे आणि मृतदेह ताब्यात द्यायचा आहे. आणि त्यानंतर आम्ही मुतदेहावर काम सुरु केलं. असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, आता रुपकुमार शाह यांच्या माहितीनंतर या प्रकरणाला एक नवीन वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.