Sushant Singh Case : रिया चक्रवर्तीसह 33 जणांवर एनसीबीचे आरोपपत्र

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर दाखल केलेल्या खटल्यात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह 33 जणांवर आज विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र 12 हजार पानांचे असून त्याला 50 हजार पानांचे परिशिष्ट जोडले आहे. त्यात आरोपींचे व्हॉट्‌स ऍप चॅट, कॉल डाटा रेकॉर्डस्‌, बॅंकांची कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांचा समावेश आहे. दोन ट्रंकमध्ये भरून आणलेल्या या आरोपपत्रात 200 साक्षिदारांचे जबाब आहेत.

याच्या प्रतींची खातरजमा केल्यानंतर त्या आरोपींना दिल्या जातील. अंमलबजावणी संचनालायाने पुरवलेल्या कागदपत्रांवर आधारीत पहिल्या खटल्यानंतर हा दुसरा खटला एनसीबीने दाखल केला आहे. राजपूत यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अंमलबजावणी संचनालयाने रिया आणि अन्य काही जणांची चौकशी केली होती. राजपुत याचा मृत्यू 14 जून 2020 ला त्याच्या निवासस्थानी आत्महत्या केल्याने झाला होता. या प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाने अद्याप कोणालाही अटक केली नाही अथवा खटला दाखल केला नाही.

ड्रग विक्रेत्याच्या अटकेनंतर चक्रवर्ती यांचा यातील समावेशाचा धागा मिळाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. मृत अभिनेत्याच्या सांगण्यावरून चक्रवर्ती, त्याचा आचारी दीपेश सावंत आणि व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा हे अंमली पदार्थ आणून देत असत. अटक केलेल्या आरोपींपैकी अनुज केशवानी याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅबॅंड हस्तगत केल्याचा दावाही एनसीबीने केला आहे.

या प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये एजिसिलोस डिमेट्रीडेस सह दोन परद्रशी नागरिक, अर्जून रामपालचा भाऊ आणि धर्मातिक एंटरटेन्मेंटचा निर्माता क्षीतिज प्रसाद यांचाही समावेश आहे. यातील बहुतांश आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. केवळ तीन आरोपी कारागृहात आहेत.

आरोपींच्या जबाबाचा उपयोग नाही
बेकायदा अंमली पदार्थ बाळगणे, बेकायदा वाहतुकीला अर्थपुरवठा करणे, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, गुन्हा करण्याची तयारी करणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. एनसीबीने आरोपींच्या अंमली पदार्थांच्या वाहतुकीचा गुन्हा सिध्द करण्याच्या दृष्टीने 20 आरोपीमचे जबाबही घेतले आहेत. मात्र ऑक्‍टोबर 2020 मध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांपुढे दिलेले जबाब म्हणजे आरोपींचा कबुलीजबाब होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.