पाटणा – अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा राजपूत असू शकत नाही. राजपूत हे महाराणा प्रतापचे वंशज आहेत. ते आत्महत्या करत नाहीत, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे आमदार अरुण यादव यांनी केला आहे.
त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आणखी एक नवीन वाद निर्माण झाला आहे. संयुक्त जनता दल आणि भाजपने यादव यांच्यावर टीका केली आहे. जातीयवाचक वक्तव्य केल्याबद्दल बिहारच्या जनतेची आणि सुशांतच्या चाहत्यांची माफी मागण्याची मागणीही या पक्षांनी केली आहे.
‘सुशांत सिंह राजपूत हा राजपूत नव्हताच. राजपूत हे महाराणा प्रतापाचे वंशज असतात. ते एखाद्या दोराला लटकवून घेऊन आत्महत्या करत नाहीत.’ असे सहारसा या आपल्या विधानसभा मतदारसंघातील एका रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी यादव म्हणाले होते.
सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करायला नको होती. राजपूत असल्याने त्याने लढायला हवे होते. राजपूत मरण्याच्या आगोदर दुसऱ्याला मारतात, असे यादव म्हणाले होते. महाराणा प्रताप हे केवळ राजपूतांचेच पूर्वज नव्हते, तर ते यादवांचेही पूर्वज होते, असेही यादव म्हणाले.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी यादव यांच्या वक्तव्यावर राजदने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.