अभिनेता रणवीर सिंह सध्या “83′ या आपल्या आगामी सिनेमामुळे विशेष चर्चेत आहे. मात्र यानंतर तो महाभारतातील सूर्यपुत्र कर्णाच्या रोलमध्ये दिसणार आहे. अलीकडेच जॅकी भगनानीने आपल्या या सिनेमाच्या टीजरची एक छोटी व्हिडीओ क्लीप शेअर केली आहे.
मात्र या सिनेमातील रणवीर सिंहच्या सहभागाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. जॅकी भगनानीने इन्स्टाग्रामवर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये या सिनेमामागील प्रेरणा काय आहे, हे सांगितले. जेव्हा मी लहान होतो, तेव्हापासून महाभारतात महावीर योद्धा कर्णचा सातत्याने अपमान झाल्याचे ऐकायला मिळाले आहे.
कर्णाच्या आयुष्यातून औदार्य, आध्यात्मिकता, सहनशीलता, विनम्रता आणि स्वाभिमान आदी गुणांचे दर्शन आपल्याला घडते, असे जॅकी भगनानीने म्हटले आहे. पूजा एन्टरटेन्मेंटचे निर्माते कर्णाच्या भूमिकेसाठी कलाकार शोधत असल्याचेही समजले आहे.
त्यासाठी रणवीर सिंहच्या नावालाच पहिली पसंती असल्याचे समजते आहे. रणवीरशी चर्चाही झाली आहे आणि त्याने हा रोल करायची तयारीही दर्शवल्याचे समजले आहे. पण रणवीर आणि निर्मात्यांमधील चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही.