शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे जमिनीची मोजणी आणि हद्द कायम करण्याचे काम सुरु असताना जमीन मोजणी भूमापक अधिकाऱ्यासह बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये दोन महिला पोलीस देखील किरकोळ जखमी झाल्या असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महिला व पुरुषांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
शिक्रापूर येथे जमीन गट नंबर ३७० मधील जमीन कासारी येथील राजेंद्र रासकर यांनी विकत घेतलेली होती, सदर जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून पोलीस बंदोबस्ताची मागणी केलेली होती, त्यानुसार आज मोजणी असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, महिला पोलीस सिमा बोचरे, स्नेहल गायकवाड हे त्या ठिकाणी बंदोबस्तसाठी गलेले होते.
यावेळी भूमापक रवींद्र शेळके हे त्यांच्याजवळील जमीन मोजणी यंत्राच्या सहाय्याने मोजणी करता असताना त्या ठिकाणी नवनाथ भुजबळ, गोरक्ष कळमकर यांसह काही व्यक्ती व महिला आल्या आणि त्यांनी रासकर यांची येथे जमीनच नसल्याचे सांगत आक्षेप घेतला, यावेळी भूमापक शेळके हे सदर लोकांना सदर जमिनीचे क्षेत्र येथे असल्याचे समजावून सांगत असताना तेथे जमलेल्या लोकांनी शेळके यांना शिवीगाळ, दमदाटी करत शेळके यांचे जमीन मोजणी यंत्र फोडून टाकण्याची धमकी देत अंगावर धावून जाऊन शेळके यांना मारहाण करू लागले, यावेळी पोलीस त्यांना समजावून सांगत असताना जमलेल्या लोकांनी पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करत महिला पोलीस कर्मचारी सिमा बोचरे व स्नेहल गायकवाड यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरवात केली.
यावेळी महिला पोलीस कर्मचारी सिमा बोचरे व स्नेहल गायकवाड या किरकोळ जखमी झाल्या आहेत, त्यानंतर शासकीय नियमानुसार सुरु असलेले जमीन मोजणीचे सुरु असलेले काम देखील बंद करण्यात आले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश विठ्ठल चव्हाण रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
शिक्रापूर पोलिसांनी नवनाथ सिताराम भुजबळ, गोरक्ष बबन कळमकर, वंदना नवनाथ भुजबळ, गोरक्ष नवनाथ भुजबळ, शिवाजी रामचंद्र भुजबळ, रतन शिवाजी भुजबळ, कल्पना कुशाल कळमकर, संतोषी गोरक्ष कळमकर, वर्षा भगवान भुजबळ यांच्यावर बेकायदा गर्दी जमाव जमवून, शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले.
यापैकी नवनाथ सिताराम भुजबळ, गोरक्ष बबन कळमकर, गोरक्ष नवनाथ भुजबळ, शिवाजी रामचंद्र भुजबळ, कल्पना कुशाल कळमकर, संतोषी गोरक्ष कळमकर या सहा जणांना लगेच अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट व अविनाश पठारे हे करत आहे.