पुणे – “शहरात करोनाचे रुग्ण वाढत असतानाच सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने लिंक तयार केली असून त्यावर आपल्या कुटुंब प्रमुख आणि कुटुंबाची सर्व माहिती तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करावे,’ असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, नागरिकांनी यात माहिती भरू नये ही लिंक फेक असल्याचे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. याविरोधात सायबर सेलला कळविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. त्यावर आता सायबर पोलीस काय पाऊल उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याबाबत बोलताना अग्रवाल म्हणाल्या,”शहरात करोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालिकेने शहराचा काही भाग सील केला असून, या भागांत घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच, पालिकेने 24 मार्चनंतर देशभरातील सर्व प्रकारची विमानसेवा बंद केल्यानंतर, परदेशातून आलेल्या व्यक्तीनी आपली माहिती महापालिकेस द्यावी यासाठी लिंक शेअर केली होती. ती वेगळी लिंक आहे, तर मंगळवारी शहरातील वेगवेगळ्या ग्रुपवर फिरत असलेली लिंक पूर्णतः वेगळी आहे. पालिकेकडून रुग्णाच्या भागात तसेच शहरात करण्यात येणारे सर्वेक्षण पूर्णतः वेगळे आहे. त्यामुळे या व्हायरल होत असलेल्या लिंकचा पालिकेशी संबंध नसल्याने नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती पालिकेच्या नावाखाली भरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काय आहे लिंकचा मेसेज
“मनपाच्या शिक्षण विभागाकडून ही लिंक तयार केली आहे. यात प्रत्येकाने आपापल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती, ताप, सर्दी खोकला यांसह इतर काही आजार आहे का? परदेशात दौरा केला आहे का? पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक अशी माहिती ऑनलाइन भरावी,’ असे या लिंकद्वारे सांगितले जात आहे. ही लिंक खरी असल्याचे मानून अनेकांनी यात सर्व माहिती भरली आहे. त्यामुळे फसवणूक होऊ शकते.