स्थायी समितीची प्रशासनाला सूचना; शंभर कोटींपेक्षा अधिक उत्पन्न वाढेल – मडिगेरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित महाविद्यालय व मॉलसुद्धा मिळकतकरांची चुकवेगिरी करू लागले आहेत. यामुळे महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडीत खात्यात जमा होत आहे. त्यामुळे शहरातील मालमत्तेचे बारकाईने, शंभर टक्के सर्वेक्षण करावे, अशी सूचना स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी केली आहे. अशा मिळकतींचे सर्व्हेक्षण व फेरतपासणी केल्यास शंभर कोटींपेक्षा अधिक उत्पन्न महापालिकेला मिळेल, असा दावा मडिगेरी यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुमारे 5 लाख 3 हजार मालमत्तेची नोंदणी आहे. मात्र, शहरात अनेक नागरिक पालिकेच्या सोयी-सुविधांचा फायदा घेऊनही बांधकामांची स्वत:हून नोंद करीत नाहीत. यात आता मॉल, नामंकित संस्थादेखील आहेत असा दावा सभापती विलास मडिगेरी यांनी केला आहे. अशा बांधकामांची नोंदणी केलेल्या नसून अनेकजणांनी वाढीव बांधकामे लपविलेली आहेत. त्या बांधकामांची महापालिकेकडे नोंदणी नसल्याने मिळकतकरांची चुकवेगिरी होऊ लागल्याचे निदर्शनास आले आहे.
तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सन 2013 मध्ये महापालिकेच्या हद्दीतील मालमत्तेचे सर्वेक्षण केले होते. त्या वेळी 81 हजार नोंदणी नसलेल्या मिळकती आढळून आल्या होत्या. त्यातील मिळकतींच्या नोंदी पूर्ण झालेल्या असल्या तरी काही मालमत्तेचे जागा मालक आढळून येत नसल्याने काही मिळकतीच्या नोंदी अद्यापही बाकी आहेत. अशा महापालिकेकडे नोंद नसलेल्या अधिकृत व अनधिकृत बांधकामांसह मिळकतकर चुकविणाऱ्यांची शोधमोहीम राबविली जात आहे.
त्यासाठी आठही प्रभागांसह करसंकलन व करआकारणी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विभागीय करसंकलन कार्यालय स्तरावर सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिळकतकर चुकविणारे, तसेच अनधिकृत बांधकामे सापडली आहेत. परवानगी घेऊन बांधलेली, मात्र महापालिकेकडे नोंदणी न केलेल्या बांधकामांची संख्याही मोठी आहे. यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. पर्यायाने उत्पन्नावरही परिणाम होत आहे.
मोठ्या संस्थांच्या मिळकतींची तपासणी करा
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला नोंद नसलेल्या मिळकतींबरोबरच मोठ्या संस्थांच्या मिळकतींची फेरतपासणी करावी, अशी सूचना केली आहे. मिळकतकर चुकवणाऱ्यांची शोधमोहीम महापालिकेने सुरू केली आहे. त्यामध्ये अनधिकृत बांधकामे व महापालिकेकडे नोंद न केलेल्या बांधकामांचा समावेश आहे. आणखी बारकाईने सर्वेक्षण करून शंभर कोटींपेक्षा अधिक उत्पन्न महापालिकेला मिळेल, असा दावा विलास मडिगेरी यांनी केला आहे.