अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आदेश; पालिकेकडून 576 पथके कार्यरत
पुणे – सर्वेक्षण पथकाकडून आवश्यक तेवढ्या गतीने काम होत नसल्याचे निर्दशनास आल्याने सर्वसाधारणपणे एका टीमने (व्यक्ती) एका दिवसात किमान 100 घरांचे सर्वेक्षण करणे सक्तीचे करण्यात आले असून पथकाच्या नेमणुकीच्या दिवसापासून हे 100 घराचे सर्वेक्षण बंधनकारक आहे. ज्यांनी कमी सर्वेक्षण केले आहे, त्यांना दररोजचे 100 घराचे सर्वेक्षण पूर्ण करून मागील अपूर्ण आकडेही भरून काढायचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.
करोनाचा शहरातील वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 576 पथके नेमण्यात आली असून प्रत्येक पथकाला दिवसाला 100 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ज्या पथकाकडून दिवसाला हे काम पूर्ण केले जाणार नाही. त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे.
1152 सेवकांची नेमणूक…
महानगरपालिका हद्दीमध्ये करोनाचा प्रसार थोपविण्यासाठी व्यापक सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून पुणे महापालिकेचे 330 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि लोकसंख्या अंदाजे 45 लक्ष आणि बाधित रुग्णांचे प्रमाण पाहता 1152 सेवकांची सर्वेक्षणासाठी नेमणूक केली आहे.