मलकानगिरी- ओडिशातील मलकानगिरी या जिल्ह्यात एका महिलेसह दोन कट्टरपंथी माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांवर एकूण सहा लाखांचे बक्षिस घोषित केलेले होते. बंदी घातलेल्या भाकपा (माओवादी) चे स्थानिक सदस्य कन्ना मधी आणि लाके पूनम यांनी आत्मसमर्पण केले आहे. दोघांनी सांगितले की नक्षलवाद्यांकडून निरपराध लोकांकडून जबरदस्ती वसुली आणि शोषण होत असल्याच्या कारणांमुळे त्यांची नक्षलवादांसोबत राहण्यास इच्छा राहिली नाही.
मलकानगिरी जिल्ह्यातील कलिमेला भागात राहणारी मधी (वय 24) हिच्यावर ओडिशा सरकारने चार लाख रुपये बक्षिस घोषित केले होते, तर बिजापूर जिल्ह्यातील भूसन या गावचे लाके (वय 22) याच्यावर दोन लाख रुपये बक्षिस घोषित केले होते.
आत्मसमर्पण करणाऱ्या दोघांनी सांगितले की, त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून दिला असून आता त्यांना समजात मुख्य प्रवाहात यायचे आहे. कारण माओवादी गरिबांची मदत करण्यापेक्षा आदिवासींकडून जबरदस्ती वसुली करतात आणि त्यांची हत्या करतात. दोघांनीही त्यांच्यावर वरिष्ठांनी वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.