पुणे –सन 2015 नंतर शहरात रविवारी 27 मिमी पावसाची नोंद झाली. मे महिन्यात अशा प्रकारचा पाऊस पडणे ही “असामान्य’ बाब असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
पुणे शहर आणि परिसरात रविवारी (दि.2) 27 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. मे महिन्यात पाऊस पडण्याचे गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक प्रमाण ठरले आहे. पुण्यात मे 2015 मध्ये 102. 8 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली होती. तर त्यांनतरच्या वर्षामध्ये हे प्रमाण तीन ते चार मिमी इतके होते. यंदा मात्र मेमध्ये चोवीस तासांत 27 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.
दरम्यान, सोमवारी( दि.3) सायंकाळी कात्रज, धायरी, वारजे, कोथरूड, सातारा रस्ता अशा बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. दक्षिण मध्य महाराष्ट्रावर असणारी हवेची चक्रीय स्थिती आता उत्तर कर्नाटक आणि लगतच्या भागावर आहे. त्यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.