लेह – कडक हिवाळ्यातही भारतीय लष्कर सीमेवर तैनात करण्यात आले आहे. त्यातच लष्कराच्या डॉक्टरांनी 28 ऑक्टोबरला एक अनोखा विक्रम केला.
त्यांनी 16 हजार फुटांवर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यशस्वी करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
एका जवानावर एक लेफ्टनंट कर्नल, मेजर आणि कॅप्टन अशा पदांवर असणाऱ्या तीन डॉक्टरांनी 28 ऑक्टोबरला ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. खराब हवामानामुळे या जवानाला हेलिाकॅप्टरने हलवणे शक्य नसल्याने तेथेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
रणक्षेत्रावरील रुग्णालयात 16 हजार फुटांवर गोठवणाऱ्या थंडीत आणि अत्यंत प्रतिकूल स्थितीत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली, असे लष्करातील सूत्रांनी सांगितले.
शस्त्रक्रिया करताना आलेल्या अनेक अडथळ्यावर मात करत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या रुग्णाची प्रकृती आता स्थीर आहे. सीमावर्ती भागातील रणक्षेत्रारील रुग्णालय पूर्णत: कार्यरत असल्याने अशा अनेक शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
सीमेवर तैनात जवानांना प्रकृतीची समस्या उद्भवल्यास विशेषीकृत उपचारांची सोय आहे.