नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी 12 वर्षीय बालिकेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केले. त्या बालिकेवर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. त्या अत्याचारपीडितेवर एम्स रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तिच्या प्रकृतीबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.
शस्त्रक्रियेनंतर बालिकेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. मात्र, रूग्णालयाला भेट दिल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रूग्णालयाला भेट दिली. फरार नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा ठोठावण्यासाठी पाऊले उचलण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याशिवाय, केजरीवाल यांनी बालिकेच्या कुटूंबीयांना 10 लाख रूपयांची मदत जाहीर केली.
संबंधित बालिका घरात एकटीच असल्याची वेळ नराधमाने साधली. उदरनिर्वाहासाठी तिचे आई-वडील काम करतात. ते घरी नसताना नराधमाने बालिकेवर लैंगिक अत्याचार केले. नंतर तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. ती बालिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. त्यांनी तिच्या आई-वडिलांना आणि पोलिसांना त्याविषयीची माहिती दिली.
नराधमाचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यासाठी शेजाऱ्यांची चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली जात आहे.