नवी दिल्ली – बेस्ट फिनिशर महेंद्र सिंह धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा आक्रमक फलंदाज सुरेश रैना यंदा होत असलेल्या मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळणार आहे. खुद्द रैनानेच ही बातमी दिली आहे.
युवराजसिंग पाठोपाठ आता रैनाही देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. त्या दृष्टीने रैनाने युवराजप्रमाणे नेटमध्ये सरावही सुरू केला आहे. रैनाने 15 ऑगस्ट रोजी धोनीसह निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतला होता. मात्र, आता त्याने उत्तर प्रदेश संघाकडून मुश्ताक अली टी-20 स्पर्धा खेळणार असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले.
ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या रैनाने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याचे सांगितले होते. या वर्षीय कौटुंबिक कारणांमुळे रैना आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. आता तो उत्तर प्रदेशकडून मैदानात उतरणार आहे.
रैनाने ट्विटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो नेटमध्ये सराव करत असल्याचे दिसून येत आहे. बीसीसीआयने करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा पुढील वर्षी घेण्याचे निश्चित केले होते. आता ही स्पर्धा 10 ते 13 जानेवारी दरम्यान सहा शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे.