माघार घेऊन रैनाने चूक केली

हॉटेलच्या रूमबाबत तक्रार आणि धोनीशी वाद

दुबई   –आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने नक्की कोणत्या कारणाने हा निर्णय घेतला याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या दोन खेळाडूंसह अन्य बारा सपोर्ट स्टाफमधील बारा सदस्यांना करोनाची बाधा झाल्याने रैनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी झालेला वाद आणि हॉटेलच्या रूमच्या दर्जावरून बिनसल्याने त्याने माघार घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, रैनाने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेत स्वतःचे नुकसानच केले आहे, असे मत संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी व्यक्त केले आहे.

रैनाने स्पर्धेतून माघार घेतली होती. सुरुवातीला वैयक्तिक कारणाने त्याने माघार घेतल्याचे सांगितले जात होते. तसेच पठाणकोटमध्ये त्याच्या कुटुंबीयांवर दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्याच्या काकांचे निधन झाले होते, त्यामुळे त्याने स्पर्धेतून अंग काढून घेतल्याचेही सांगितले गेले. मात्र, रैनाने त्याला देण्यात आलेल्या हॉटेलच्या रूमबाबत नापसंती दर्शवली होती. तसेच त्याने रूमच्या दर्जाबद्दलही संघ व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. त्याने जे वाद घातले त्यावरून त्याचे धोनीशीही खटके उडाल्याचे सांगितले जात आहे. 

संघातील एक खेळाडू दीपक चहर करोनाबाधित असल्याचे समोर आल्याने सुरक्षेसाठीच तयार केल्या गेलेल्या बायो-बबलमध्येही राहणे त्याला भीतीदायक वाटत होते. त्यामुळेच तणावातूनच त्याने धोनीशी वाद घातला व रूमबाबतही तक्रार केली असावी, अशी शक्‍यता आयपीएल समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. रैनाने कोणाशीही चर्चा न करता परस्पर निर्णय घेतला ते योग्य नाही. असे अचानक स्पर्धेतून माघार घेत त्याने स्वतःचेच नुकसान केले आहे. रैनाच्या माघारीने संघातील अन्य खेळाडूंनाही भीती वाटत आहे मात्र, ते यातून लवकरच बाहेर येतील व स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करतील. रैनासारख्या खेळाडूंना यश देखील सांभाळता येत नाही, त्यांच्या डोक्‍यात यशाची हवा जाते.

ऋतुराज गायकवाडला संधी

रैनाने माघार घेतल्याने महाराष्ट्राचा अव्वल फलंदाज ऋतुराज गायकवाड याला संघात संधी मिळण्याचे संकेतही श्रीनिवासन यांनी दिले आहेत. ऋतुराजने देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानेच चेन्नई संघाने त्याला आपल्याकडे घेतले होते.

रैनाचा करार संपणार

नाराजी नट्यामुळे रैना मायदेशी परतला असला तरी आता त्याच्याशी चेन्नई संघाशी असलेला करार संपुष्टात आणला जाणार असल्याचेही बोलले जात आहे. पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी रैनाला रिलीज केले जाणार असून आता यापुढे तो चेन्नई संघाचा भाग नसेल, असेही श्रीनिवासन यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.