सुरेश प्रभू, डॉ. भामरे यांचा पत्ता साफ; अनेक मंत्र्यांना दिला डच्चू

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू आणि माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह अनेक मंत्र्यांना डावलण्यात आले आहे. यात अर्थमंत्री अरूण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, कृषी मंत्री राधामोहन सिंग, महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी, राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड, अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाची सत्ता हाती घेतल्यानंतर सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात आणण्यासाठी शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. सेनेने प्रभू यांचे नाव न पाठविल्यामुळे मोदी यांनी प्रभू यांना राज्यसभेवर घेवून मंत्रिमंडळात समावेश केला होता. रेल्वे खात्याचे मंत्री बनविले होते.

नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून देशाची धुरा हाती घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र, सुरेश प्रभू यांचा नवीन सरकारमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाही डच्चू देण्यात आला आहे.

अरूण जेटली यांनी स्वत: मंत्रिमंडळात समावेश न करण्याची विनंती केली होती. शिवाय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही प्रकृती बरी नाही. तब्येतीच्या कारणामुळे मोदी यांनी दोन्ही मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश केलेला नाही. मात्र, कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्यासह वगळण्यात आलेल्या उर्वरित मंत्र्यांना ढिसाळ कामकाजामुळे डावलण्यात आले असल्याचे समजे.

Leave A Reply

Your email address will not be published.