बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणाचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आज समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आकाचा या प्रकरणात संबंध आहे, हे स्पष्ट होत असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे. माझे आरोप हवेतील नव्हते. मी जे बोललो त्याला पुष्टी मिळाली आहे, असेही ते म्हणाले. तसेच यावेळी बोलताना दीड वर्षांपूर्वी परळीत झालेल्या एका खुनाचा दाखला देत धस यांनी सवाल उपस्थित केले आहेत. महादेव दत्तात्रय मुंडे खून प्रकरण दाबण्यासाठी आका आणि इतर सहकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता, असा गौप्यस्फोटही धस यांनी केला.
आज समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये आका, चाटे, घुले हे आहेत हे स्पष्ट दिसत आहेत. माझे आरोप हवेतील नव्हते. या लोकांचा खंडणी, हत्येशी आकाचा संबंध आहे, यातून हे सिद्ध होत आहे. आवादा कंपनीच्या शिंदेंना 29 नोव्हेंबरला गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं. तिथून मारत मारत येथे आणलं, त्यानंतर त्याला सोडून दिले. त्याचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यामुळे 101 टक्के आका, विष्णू चाटे, सुरेश आंधळे हे आरोपी आहेत, असा आरोपही धस यांनी केला.
पीआय पाटीलला आरोपी करा
याप्रकरणात पीआय पाटील याला सहआरोपी केले पाहिजे तसेच महाजन आणि गर्जेंना बडतर्फ केले पाहिजे किंवा गडचिरोलीला पाठवले पाहिजे. असे सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुख हत्याप्रकरणात आत्तापर्यंत 7-8 आरोपी झाले आहेत, आता नववा देखील टाकला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
तो मी नव्हेच म्हणणारा, हा मी आहेच
जे गुन्हा करतात ते तो मी नव्हेच असे म्हणतात. पण आता हा मी आहेच हे दिसत आहे. मी जे म्हणालो होतो त्याला पुष्टी मिळाली आहे. हे आरोपी खरे आहेत. अजूनही बरेच आरोपी आहेत, हे सोटमुळे सापडली आहेत. अजून आंगतुक मुळे आहेत. आंगतुक मुळे अजून राहिली आहेत, त्यांचाही बंदोबस्त व्हावा, अशी आमची मागणी आहे. त्यांची रितसर नावे एसआयटीला देऊ, असेही धस म्हणाले.