सुप्रियाताईंच्या कार्यकर्त्यांनी गाठलं थेट कोल्हापूर

बारामतीचे बारा किलो लाडू दिले चंद्रकांतदादांना भेट

कोल्हापूर – बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाचं कमळ फुलविण्याची जबाबदारी असलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारा किलो लाडू भेट म्हणून दिले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा पराभव व्हावा यासाठी चंद्रकांत पाटील बारामतीत तळ ठोकून होते. या मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ राहून कार्यकर्त्यांचे नियोजन करण्याचं काम चंद्रकांतदादा करत होते.बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे तब्बल दीड लाख मतांनी निवडून आल्या. भाजपाकडून या मतदारसंघात रासपचे दौडमधील आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली होती.

त्यामुळे बारामतीची लढत रंगतदार झाली होती. बारामती जिंकण्याचा चंग भाजपानं केला होता. बारामती जिंकणारच या आशेने चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना मुलीच्या पराभवाची चिंता सतावत आहे. त्यामुळे त्यांना झोप लागत नाही असा टोला लगावला होता. स्वत: भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली होती. त्यामुळे बारामती शरद पवार राखणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते.

दरम्यान निकाल लागल्यानंतर बारामतीत पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंना विजय प्राप्त झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांना बारा किलो लाडू भेट म्हणून दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रविण शिंदे, यशवंत ठोकळ, विशाल जाधव यांनी कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जात ही भेट दिली. यावेळी चंद्रकांतदादांनीही त्यांचे स्वागत करत मला शुगर असल्याने गोड खात नाही असं म्हटलं. त्यावर कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर एक लाडू खाल्ला. तसेच सुप्रिया सुळे यांच्याशी चांगले संबंध आहेत. बारामतीत पुन्हा आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन भेट देऊ असंही चंद्रकांतदादांनी सांगितले.

मागील लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारंसघातून महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी जानकरांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली. केवळ 70 हजारांच्या फरकाने सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडून आल्या. त्यावेळी महादेव जानकर यांनी कमळ चिन्हावर निवडणूक न लढविल्यामुळे हा फटका बसला असल्याचं भाजपामध्ये बोललं जाऊ लागलं. त्यामुळे यंदा महादेव जानकरांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवा असं सांगितले. त्यावर जानकरांनी नकार दिल्याने कांचन कुल यांना भाजपाची उमेदवारी देण्यात आली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.