सुप्रिया सुळेंची विजयी हॅटट्रिक

बारामतीचा बालेकिल्ला राखला : दीड लाख मतांनी कुल यांचा पराभव

पुणे – राज्याच सत्ताकेंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. बारामतीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे. सुळे यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा तब्बल 1 लाख 54 हजार मतांनी दणदणीत पराभव केला. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुळे यांना मिळालेले हे मताधिक्‍क्‍य दुप्पट आहे. विशेष बाब म्हणजे, बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज उतरविली होती. मात्र, त्यानंतरही सुळे यांनी सहज मताधिक्‍य मिळवित खासदारकीची हॅट्रीक साधली. सुळे यांना तब्बल 6 लाख 83 हजार 705 मते मिळाली, तर कांचन कुल यांना 5 लाख 28 हजार 711 मते मिळाली असल्याची प्राथमिक माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तर व्हीव्हीपॅट मोजणीमुळे अंतिम निकाल रात्री उशीरा जाहीर होणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुमारे 21 लाख 12 हजार 208 मतदार होते. त्यातील 12 लाख 99 हजार 792 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. या मतदारसंघातून एकूण 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातच, मागील लोकसभेच्या तुलनेत यंदा तब्बल 2 लाख 33 हजार 236 इतके मतदान वाढल्याने हा वाढलेला टक्‍का कोणाला धक्‍का देणार याकडे लक्ष लागले होते. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्या फेरीपासूनच सुळे यांनी आघाडी घेतली होती.

पहिल्या फेरीत सुळे यांना सुमारे 1800 मतांची आघाडी होती. त्यात प्रामुख्याने, भोर, बारामती आणि इंदापूर मतदारसंघांतून सुळे यांना मताधिक्‍य होते तर खडकवासला आणि दौंड विधानसभा मतदारसंघातून कांचन कुल यांना पुरंदर, दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सुळे यांच्या पेक्षा जास्त मते होती. तर दुसऱ्या फेरीत कुल यांना सुमारे 2300 मतांची आघाडी मिळाली. मात्र, एकूण मतांची आकडेवारी पाहता सुळे यांच्यापेक्षा कुल यांना केवळ 200 मतांची आघाडी होती. त्यानंतर सुळे यांना प्रत्येक फेरीत मिळणारे मताधिक्‍य हे लक्षणीय होते. त्यामुळे दहाव्या फेरीला सुळे यांनी थेट 50 हजारांचे मताधिक्‍य गाठले तर 17 व्या फेरी अखेर हे मताधिक्‍य 1 लाख 12 हजारांच्या वर होते, तर शेवटच्या फेरी अखेर सुळे यांचे मताधिक्‍य तब्बल 1 लाख 54 हजारांवर गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, सुळे यांना चार विधानसभांमधून मताधिक्‍य असून, सर्वाधिक एक लाखांचे मताधिक्‍य बारामतीकरांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत सुळे यांचा परभाव करण्यासाठी सर्व स्तरावर जोर लावत ही जागा प्रतिष्ठेची केली होती. बारामतीत भाजपकडून प्रचारासाठी दिग्गज्जांची फौज उतरविण्यात आली होती. शेवटच्या टप्प्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बारामती तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघात सभा घेत राष्ट्रवादीला धक्‍का देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही “ईव्हीएम’ मशीनबाबत शंका उपस्थित करत बारामतीबाबत काळजी व्यक्‍त केली होती. त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीला यंदा धक्‍का बसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, सुळे यांनी गतवर्षी पेक्षा दुप्पट मते मिळवित हे सर्व अडाखे खोटे ठरवित विजय खेचून आणला.

इंदापूर, बारामती, भोरचा हातभार
सुळे यांना हे मताधिक्‍य मिळवून देण्यात सहा मतदारसंघांचा हातभार असला तरी इंदापूर, बारामती आणि भोरमध्ये सुळे यांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळाले आहे. दौंड, पुरंदर तसेच खडकवासला मतदारसंघात सुळे यांच्या मतांची टक्‍केवारी घटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे मतांचे प्रमाण अधिक असले तरी सुळे यांना या तीनही मतदार संघात अपेक्षित मताधिक्‍य मिळालेले नाहीत. तर खडकवासला मतदारसंघात सुळे यांचे मताधिक्‍य 30 हजारांनी घटले आहे. मागील निवडणुकीत युतीचे उमेदवार महादेव जानकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 28 हजारांचे मताधिक्‍य होते. मात्र, मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुळे यांना पडलेल्या मतांची संख्या अधिक असली तरी मताधिक्‍य घटल्याने राष्ट्रवादीसाठी ही चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीने लक्ष वेधले
बारामती लोकसभा मतदारसंघातही वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराच्या मतांनी राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. सुमारे 43 हजार 945 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून नवनाथ पडकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला 6867 मते मिळाली. अपक्ष उमेदवार सुरेश वीर यांना 3 हजार 284, शिवाजी नांदखिले यांना 4 हजार 404 मते मिळाली असून भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या दशरथ राऊत यांना सुमारे 3817 मते मिळाली. इतर उमेदवारांना एक ते दोन हजारांचे मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

बारामतीत नोटाला चौथ्या क्रमांकाची मते
बारामती लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चौथ्या क्रमांकाला पसंती दिली आहे. बारामतीत पहिल्या तीन सर्वाधिक मते असलेल्या उमेदवारांनंतर तब्बल 7 हजार 846 मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांमधील कोणीही उमेदवार पसंत नसल्याने मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. तर सर्वाधिक नोटा खडकवासला, पुरंदर आणि भोर मतदारसंघातून असून सर्वांत कमी नोटा बारामती मतदारसंघात असल्याची माहिती आहे.

आपण सर्वांनी माझ्यावर विश्‍वास ठेवत मला पुन्हा एकदा संसदेत आपली प्रतिनिधी म्हणून निवडून पाठविले, याबद्दल मी आपली आभारी आहे. सर्वांचे सहकार्य, शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहतील, अशी मला खात्री आहे. हा संपूर्ण मतदारसंघ माझे कुटुंब आहे. पवार साहेब आणि अजितदादा यांनी दाखवून दिलेल्या विकासमार्गावरुन तुम्हा सर्वांच्या सोबतीने गेली 10 वर्षे चालत आहे. यापुढील पाच वर्षेदेखील दुप्पट उत्साहाने आपण एकत्र राहू. या निवडणुकीच्या काळात माझे कुटुंबीय, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, आघाडीचे नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार आदी सर्वांनी सर्वस्व झोकून प्रचार केला. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. या निवडणुकीच्या काळात प्रचाराचा जोर असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आता निकालानंतर आपण सर्वांनी प्रचाराची कटूता मनात ठेवू नये, एकत्रितपणे आपण एकमेकांच्या साथीने मतदारसंघाचा विकास करू.

– सुप्रिया सुळे, नवनिर्वाचित खासदार, बारामती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.