व्हिडीओ : पंतप्रधानांच्या शरद पवारांवरील ‘यु-टर्न’ टीकेला सुप्रिया सुळेंचे लोकसभेत उत्तर; म्हणाल्या…

नवी दिल्ली – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बुधवारी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. कृषी कायद्यांवरून शरद पवार यांनी ‘यु-टर्न’ घेतल्याचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला होता. यावेळी सभागृहामध्ये शरद पवार यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. दरम्यान, शरद पवार यांच्यावरील टीकेला आज सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी, “मोदींनी आमच्या पक्षाच्या प्रमुखांवर टीका केली. मी उभं राहून त्यांना थांबवू शकत होते, पण ही आमची संस्कृती नाही. मला काही कागदपत्रं, तथ्य समोर मांडायची आहेत. मोदीजी भाजप सदस्य असले तरी ते देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांनी सभागृहात मांडलेला मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला. मात्र यावेळी त्यांनी पत्रातील चार ओली वाचल्या नाहीत. ज्यामध्ये,  राज्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे अमलबजावणी केली जावी असं नमूद करण्यात आलंय” असं वक्तव्य केलं.

…त्यामुळे मला ‘या’ सरकारने घेतलेल्या यु-टर्नबद्दल सांगायचंय

यावेळी सुळे यांनी मोदी सरकारने घेतलेल्या यु-टर्नचा पाढाच वाचून दाखवला. त्या म्हणाल्या, “मोदींनी यु-टर्न हा शब्द वापरला त्यामुळे मला या सरकारने घेतलेल्या यु-टर्नबद्दल सांगायचं आहे. मनमोहन सिंग सरकारने जीएसटी आणलं होतं, तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी याला विरोध केला होता. आम्ही आरटीआय, अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क, आधार, मनरेगा अशी अनेक विधेयकं आणली. बदल झाला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. जेव्हा ही विधेयकं आणण्यात आली तेव्हा सर्वांशी चर्चा करुन, त्यांचं मत मागवूनच कायदे करण्यात आले. मनरेगामुळे करोना महासाथीमुळे नोकरी गेलेल्यांना रोजगार मिळाला. आधारलाही विरोध करण्यात आला होता, आणि आज ते जीएसटी, मनरेगा, आधारवरुन आपली पाठ थोपटत आहे. आता हा कोणता ‘टर्न’ आहे मला माहिती नाही”

शरद पवार कृषीमंत्री असताना एकही आंदोलन का झालं नाही?  

सुप्रिया सुळे यांनी यावेळी, “शरद पवारांनी त्यावेळी कायदा बदलण्याची शिफारस केली होती. तो मार्ग या सरकारने का निवडला नाहीया? जर हे पत्र सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं तर पवार कृषीमंत्री असताना एकही आंदोलन का झालं नाही? मी त्यांची बाजू मांडत नाहीये, तेवढी क्षमता त्यांच्याकडे आहे. मात्र मला काही तथ्य मांडावी लागतायेत कारण पंतप्रधानांनी त्यांचं नाव घेतलं,” असं स्पष्ट केलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.