मुंबई – काही दिवसांपूर्वी (11 जानेवारी) राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. अश्यातच, आज पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ईडीने दुसऱ्यांदा धाड मारल्याने मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे.
आज पहाटेच ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड मारली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी सुरू केली आहे. ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यातील ईडीने ही दुसरी छापेमारी केल्याने हसन मुश्रीफ यांना मोठा झटका बसला असून, सगळीकडे एकच खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”सातत्याने केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का?
अशी शंका येऊ लागली आहे. मात्र, आता ही शंका न राहता खरंच त्या दिशेने पाऊल जात असल्याचे दिसून येत आहे. देशातील ईडी सीबीआयच्या 95 टक्के कारवाई या विरोधकांवरील आहेत. संविधानाचा सन्मान न करता केंद्र सरकार काम करत आहे.’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफांवरील कारवाई संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्दशनास आणून देणार असल्याचे देखील यावेळी म्हटले आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर 11 जानेवारी रोजी पडली पहिली धाड !
11 जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. यावेळी त्यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती.