हिंजवडी, दि. 20 – पौड (ता. मुळशी) येथे असलेल्या पत्रकार भवनाच्या सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुळशीतील पत्रकारांशी संवाद साधून तालुक्यातील प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. तसेच समस्या सोडविण्याचे त्यांनी या वेळी आश्वासन दिले.
दीड तास चाललेल्या या परिसंवादात त्यांनी अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत ते सोडविण्यासाठी संबंधित विभागाशी बैठक आयोजित करून हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. परिसंवादात मुळशी तालुक्यातील पुणे-कोलाड रस्त्यावर अर्धवट कामामुळे व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नित्याने होणारे अपघात, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्त्याची झालेली दुरवस्था, खराब व नित्कृष्ट रस्ते, पर्यावरणाची होणारी हानी, धरण भागात पर्यटनाला आवश्यक गोष्टींची कमतरता तसेच पर्यटनासाठी टाटा धरणाच्या भोवताली रिंग रोड, मुळशीतील डोंगर उत्खनन, हिंजवडीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या गावामधील कचरा समस्या, पौडची वाहतूक कोंडी, पोलीस वसाहत व नव्या पोलीस ठाणे निर्मितीचा प्रश्न, हिंजवडी, माण मारुंजी, भूगाव, बावधन, सूसमधील पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच सोसायटीधारकांनी पिण्याच्या पाण्याच्या मुद्द्यांवर न्यायालयात याचिका दाखल केल्याने त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बैठकीचे नियोजन व वाढत्या शहरीकरणामुळे होत असलेले नद्यांचे प्रदूषण अशा विषयांवर पत्रकारांनी खासदार सुळे यांच्याशी संवाद साधला.