रमेश थोरात यांना योग्य न्याय दिला जाईल

खुटबाव येथे खासदार सुळे यांचे कार्यकर्त्यांना आश्‍वासन

केडगाव – दौंडमधील राष्ट्रवादीची नेते रमेश थोरात यांना पक्षाने नेहमीच ताकद दिली आहे, विधानसभा निवडणुकीत अल्पमताने त्यांचा पराभव झाला असला तरी तो पराभव नसून विजय आहे. पक्ष त्यांच्यापाठीशी ठामपणे उभा आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन थोरात यांना भविष्यात योग्य न्याय दिला जाईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दौंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांना अवघ्या 650 मतांनी पराभव पत्करावा लागला आले; त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत. याच कारणास्तव आज खुटबाव ग्रामस्थांनी गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवले होते. ही बाब लक्षात घेत खासदार सुप्रिया सुळे खुटबाव येथे आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

थोरात यांचा पराभव जिव्हारी लागला असल्याचे सांगत थोरात यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी सुळे यांच्याकडे लावून धरली. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, जि. प. सदस्या राणी शेळके, तालुकाध्यक्ष आप्पासो पवार, सभापती दिलीप हंडाळ, रामभाऊ चौधरी, हाजी सोहेल खान यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.