बारामती : राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने सध्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांबाबत एक धक्कादायक दावा केला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या “मी याआधी कोणालाच हे सांगितलेलं नाही. पण 2 जुलै रोजी सर्वांनी शपथ घेतली. पण 30 जून रोजी जो माझा वाढदिवस आहे, त्यांनी मला गिफ्ट दिलं. 30 जूनला शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नाहीत आणि त्यांना त्या पदावरुन काढण्यात आलं आहे हा निर्णय या सर्वांनी घेतला.
त्यांनी बैठक घेतली का? जर पदावरुन काढलेलं असतं तर 1 जुलै रोजी एका तरी वृत्तपत्रात ही बातमी आली असती. किमान आम्ही शरद पवारांना अध्यक्ष पदावरुन काढून टाकल्याचं ट्विट तरी केलं असतं. कोर्टात तो कागद आला. पण त्या बैठकीचा पुरावा ना माझ्याकडे आहे, ना कोर्टाकडे आहे. शरद पवारांना 30 जून रोजी कोणत्या आधारे शरद पवारांना अध्यक्ष पदावरुन काढलं? काहीतरी प्रक्रियेचं पालन झालं असेल ना,” असं म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, “जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा तेच लोक आम्ही तुम्हाला सोडू देणार नाही असं सांगत होते. मग एक-दीड महिन्यात असं काय घडलं की ज्या शरद पवारांना आग्रह करुन तुम्ही बसा म्हणला होतात त्याच पदावरुन काढून टाकलं”.
“मला याबद्दल काही माहिती नव्हतं. जर मला कळलं असतं तर देशालाही कळलं असतं की शरद पवारांना त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षपदावरुन काढलं. हे ऑन रेकॉर्ड कोर्टात पेपर आहे. मिनिट्समध्ये नावं नसून, अजित पवारांची सही आहे.
सहीप्रमाणे अजित पवारांनी शरद पवारांना 30 जूनला अध्यक्षपदावरुन काढलं आणि 2 जुलैला त्यांनी शपथ घेतली. यानंतर 3 जुलैला पत्रकार परिषदेत त्यांना तुमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? असं विचारलं असता शरद पवार उत्तर दिलं हेदेखील रेकॉर्डवर आहे,” असंही त्यांनी सांगितलं.