नवी दिल्ली – दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा आकडा नवनवे विक्रम प्रस्थापित करत असल्याने देशातील करोना परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अनेक राज्यांमध्ये हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन व रेमडेसिवीरसारख्या औषधांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून अनेक राज्य सरकारे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार करताहेत. याच पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
देशातील ऑक्सिजन पुरवठ्याचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. टास्क फोर्स ही एक १२ सदस्यीय समिती असणार असून ती केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाशी सल्ला मसलत करण्यासाठी स्वतंत्र असेल. ही समिती आपली नियमावली तयार करण्यासही स्वतंत्र असेल असंही सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
टास्क फोर्सचे १२ शिलेदार कोण आहेत?
- डॉ. भबतोष विश्वास, माजी कुलगुरू, पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कोलकाता
- डॉ. देवेंद्र सिंह राणा, चेअरपर्सन, सर गंगाराम रुग्णालय, दिल्ली
- डॉ. देवी प्रसाद शेट्टी, चेअरपर्सन, नारायण हेल्थकेअर, बंगळुरु
- डॉ. गगनदीप कांग, प्राध्यापक, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू
- डॉ. जेवी पीटर, डायरेक्टर, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू
- डॉ. नरेश त्रेहन, चेअरपर्सन, मेदांता रुग्णालय, गुरुग्राम
- डॉ. राहुल पंडित, डायरेक्टर, क्रिटिकल केअर मेडिसीन अँड आयसीयू, फोर्टिस रुग्णालय, मुंबई
- डॉ. सौमित्र रावत, चेअरमन, डिमार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोअँटरॉलॉजी आणि लिवर ट्रान्सप्लांट, सर गंगाराम रुग्णालय दिल्ली
- डॉ. शिव कुमार सरीन, वरिष्ठ प्राध्यापक, इंस्टीट्यूट ऑफ लिवर अँड बिलीरी सायन्स, दिल्ली
- डॉ. जरीर एफ उदवाडिया, कन्सल्टेंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा रुग्णालय,मुंबई
- सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार
- नॅशनल टॉक्स फोर्स संयोजक देखील टास्क फोर्सचे सदस्य असणार आहेत
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील करोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला करोना परिस्थितीवरून फटकारलं आहे. राज्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. करोना स्थितीवर सुप्रीम कोर्ट नजर ठेवून आहे.