नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना दिलासा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या एका टिप्पणीवरून थरूर यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात मानहानीच्या खटल्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याने मोदींची तुलना शिवलिंगावर बसलेल्या विंचवाशी केली होती, असा दावा थरूर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये केला होता. त्यावरून भाजपचे नेते राजीव बब्बर यांनी थरूर यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली. त्या प्रकरणी सुरू झालेली खटल्याची प्रक्रिया रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दर्शवला. त्यामुळे थरूर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.