ऍमेझॉन सर्वोच्च न्यायालयात; फ्युचर रेटेल व रिलायन्स दरम्यानच्या व्यवहाराला स्थगीती

- रिलायन्स कंपनीचे शेअर घसरले

नवी दिल्ली – अमेझॉन कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे फ्युचर रिटेल आणि रिलायन्स दरम्यान झालेल्या व्यवहारपुर्तीत एक नवा अडथळा निर्माण झाला आहे. रिलायन्स व्यवहाराला दिल्ली उच्च न्यायालयातील एक सदस्यीय खंडपीठाने स्थगिती दिली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या विस्तारित खंडपीठाने ही स्थगिती उठविली होती.

विस्तारित खंडपीठाच्या या निर्णयाला ऍमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व संबंधितांना याबाबत नोटीस जारी केली आहे. एवढेच नाही तर या अनुषंगाने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात या विषयावर सुनावणी चालू ठेवावी मात्र निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

आता फ्यूचर्स समूहाला नोटीसीचे उत्तर देण्यास तीन आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर दोन आठवड्यांनी फ्युचर समूहाच्या माहितीला ऍमेझॉन प्रतीउत्तर देणार आहे. त्या पुढील सुनावणी नंतर म्हणजे पाच आठवड्यानंतर होईल. त्यामुळे हा व्यवहार आता पाच आठवडे थांबला आहे. रिलायन्स कंपनीच्या शेअरच्या भावात आज 2 टक्‍क्‍यापर्यंत घट झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.