नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे नेते शहानवाज हुसेन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने अनुमती दिली होती. तथापि, या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मात्र आज स्थगिती दिली आहे.
ही स्थगिती देताना न्यायमूर्ती यू. यू. लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हुसेनच्या याचिकेवर दिल्ली सरकारला नोटीस जारी करून त्यांच्याकडून काही उत्तरे मागितली आहेत. आता सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या प्रकरणाची पुढील सुनावणीसाठी होणार आहे. तोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सन 2018 मध्ये एका महिलेने हुसेन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, या मागणीसाठी सदर महिलेने दिल्लीच्या स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती.
स्थानिक कोर्टाने महिलेच्या अर्जाची दखल घेत शहानवाज हुसेन यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला होता. त्याच्या विरोधात हुसेन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली पण त्यांना तिथेही दिलासा मिळू शकला नव्हता. पण त्यांना आता सर्वोच्च न्यायालयाने मात्र दिलासा देत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास स्थगिती दिली आहे.