हाथरस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले

नवी दिल्ली – हाथरस प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील योगी सरकारला फटकारत ही घटना भयंकर असून पुन्हा पुन्हा तोच युक्तिवाद नको आहे, असेही स्पष्ट केले आहे. हाथरसमधील साक्षीदारांना कशा पद्धतीने सुरक्षा पुरवली जात आहे यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश योगी सरकारला दिला आहे. याप्रकरणी सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

हाथरस प्रकरणावरुन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व थांबले पाहिजे, अशा शब्दांत उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. हाथरस घटना भयंकर असून आम्हाला न्यायालयात पुन्हा पुन्हा तोच युक्तिवाद नको आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हाथरस प्रकरणी निःपक्षपातीपणे तपास व्हावा, यासाठी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यावेळी त्यांनी केंद्राकडे आपण आधीच सीबीआय चौकशीची मागणी केल्याची माहिती दिली. सीबीआयने तपास हाती घेतल्याने कोणीही आपल्या हेतूसाठी खोट्या आणि बनावट गोष्टी पसरवू शकणार नाही, असा युक्तिवाद उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आला.

तसेच, अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु करण्यासंबंधी सर्वांकडून सूचनाही मागितली आहे. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने गुरुवापर्यंतचा वेळ मागितला असून पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.