नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात आज एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला हिंदीत युक्तीवाद करण्यास मनाई केली. या न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे तुमचे काय म्हणणे असेल तर ते तुम्ही इंग्रजीत मांडा असेही न्यायालयाने त्यांना सांगितले.
शंकर लाल शर्मा नावाचा व्यक्ती आपले गाऱ्हाणे घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. अर्थात त्याने तेथे याचिका दाखल केली आहे. त्याला इंग्रजी भाषेचा गंध नाही. म्हणजे तो इंग्रजी बोलू शकत नाही व त्याला ती भाषा समजतही नाही. त्यामुळे तो हिंदीतच त्याचे म्हणणे मांडत होता. न्यायालय त्याला काय सांगतेय हेही त्याला समजत नव्हते. त्यामुळे न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने त्याला एक वकील उपलब्ध करून दिला.
आपण अनेक न्यायालयांचे दार ठोठावले असून आपल्याला कोठेही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आपण येथे आलो आहोत. त्यावर न्या. जोसेफ म्हणाले की तुमची फाइल आम्ही वाचली असून केस अगदी किचकट आहे. शिवाय तुम्ही काय म्हणणे मांडत आहात तेही आम्हाला समजत नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळी तेथून जात असलेल्या अतिरिक्त सॉलिटिर जनरल माधवी दिवाण यांना बोलावले.
दिवाण यांनी शंकर लाल शर्माशी त्याच्या भाषेत संवाद साधला व न्यायालय त्याला वकिल उपलब्ध करून देण्यात तयार असल्याचे त्याला सांगितले. त्यांनी ही सूचना स्विकारल्यावर न्यायालयाने तेथेच उपस्थित असलेल्या एका वकिलाला ही केस लढण्याबाबत विचारले. त्यावर वकिलानेही तयारी दर्शवली. तेव्हा तुम्ही निशुल्क लढाल अशी आम्ही अपेक्षा करतो असे न्यायाधीशांनी त्या वकिलाला सांगितले. त्यावर वकिलाने होकार दर्शवला. त्यानंतर न्यायालयाने 4 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.