परित्यक्‍ता महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

जेथे आश्रय घेतला तेथूनच खटला दाखल करण्यास परवानगी

नवी दिल्ली – परित्यक्ता महिलांनी जेथे आश्रय घेतला असेल, तेथूनच त्या वैवाहिक प्रकरणांसाठी खटले दाखल करू शकतात, असा महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. यामुळे वैवाहिक तंट्यांसाठी कोर्टाची पायरी चढावी लागणाऱ्या महिलांचा त्रास कमी होणार आहे. सासरच्यांकडून होणारा कौटुंबिक त्रास, जाच अथवा शारीरिक, मानसिक छळ यामुळे घराबाहेर पडावे लागलेल्या महिला जेथे आश्रय घेतील, तेथूनच त्या कौटुंबिक प्रकरणे दाखल करू शकणार आहेत.

अलाहबाद उच्च न्यायालयामधील एका प्रकरणी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. रुपाली देवी यांनी ही आव्हान याचिका दाखल केली होती. हुंड्यासाठी छळ होतो म्हणून रुपाली देवी यांनी आपल्या माहेरच्या घरून दाखल केलेली याचिका अलाहबाद उच्च न्यायालयाने ग्राह्य धरली नव्हती. हुंड्यासाठीचा छळ ही सातत्याने होणारी गोष्ट नाही. त्यामुळे त्या गुन्ह्याचा तपास अधिकार कक्षाबाहेर जाऊन केला जाऊ शकणार नाही. म्हणून न्यायालयाने देवी यांची याचिका फेटाळली होती. त्या निर्णयाला देवी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पिठाने देवी यांचे म्हणणे ग्राह्य मानले. हुंड्यासाठीच्या छळामुळे मानसिक छळ हा पती किंवा अन्य नातेवाईकांकडून केला जाणारा उघड उघड छळ आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.